सजग मतदारच सजग लोकशाही निर्माण करू शकतो! 🗳️
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका : जनतेने सजग व्हावे, उमेदवारांचे चारित्र्य तपासावे!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आता दारात येऊन ठेपल्या आहेत. निवडणुका जाहीर होताच प्रत्येक उमेदवार आपला लोकसंपर्क वाढवू लागला आहे. कोणी धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रायोजक होत आहेत, कोणी समाजसेवेच्या नावाखाली लोकांवर पैसे खर्च करीत आहेत, तर काही नव्या क्लुप्त्या लढवून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. "आपण समाजोपयोगी आहोत" असे दाखविण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.
परंतु या गोंधळात मतदारांनी अत्यंत सजग राहणे गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षांत गावात, तालुक्यात किंवा जिल्ह्यात कोणती संकटे आली आणि त्या वेळी हेच उमेदवार कुठे होते, याचा विचार करणे अत्यावश्यक आहे. फक्त आश्वासने देणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये, तर त्यांच्या कृतीचा मागोवा घ्यावा.
जनतेने विचारावे असे काही मूलभूत प्रश्न :
उमेदवाराचा मागील कार्यकाळातील अहवाल काय आहे?
त्याने गावात किंवा विभागात कोणती ठोस कामे केली?
शासकीय निधी किती मिळाला आणि तो नेमका कुठे खर्च झाला?
आरोग्य केंद्रातील सोयीसुविधा व स्टाफ वाढवण्यासाठी त्याने काय प्रयत्न केले?
बेरोजगार युवकांना रोजगार निर्मितीबाबत त्याचे धोरण काय आहे?
विद्यार्थ्यांना, महिलांना,वृद्धाना, आजारी व्यक्तींना मदत करणारे कार्यक्रम त्याने चालवले का?
आजारी व्यक्तींसाठी औषधोपचार,वाहन व्यवस्था केली होती का?
गावात चालणारे बेकायदा उद्योग जसे की दारू, गुटखा, वाळू उपसा यावर त्याची भूमिका काय होती? त्यावर त्याने कधी आवाज उठवलेला का? की त्याची भूमिका त्यांना मदत करणारी होती.
गावातील शाळा, विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी त्याने कोणत्या योजना राबविल्या? त्या कोणत्या होत्या?
उमेदवाराची पार्श्वभूमी जाणून घ्या :
उमेदवार मागील पाच वर्षांत कोणत्या पक्षात होता आणि आत्ता कोणत्या पक्षात आहे? पक्ष बदलला असल्यास कोणत्या कारणाने?
त्याची आर्थिक स्थिती तेव्हा आणि आता काय बदलली आहे?
त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत का? खून? मारामारी? धमकी? जमीन लाटणे असे प्रकार त्याच्याकडून झालेत नाही ना? त्याला पोलीस कोठडी कधी मिळाली होती का? मिळाल्यास कोणता आरोप होता?
जमीन खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये त्याचा सहभाग कसा आहे? त्याच्या नावावर किती भूखंड आहेत? विक्री मागून घेतलेत का? वडिलोपार्जित आहेत का? की गरीब दुबळ्या लोकांवर केसेस टाकून धमकाऊन विक्री लाऊन घेतल्यात?
त्याने संपत्ती प्रामाणिक मार्गाने मिळवली का की बेकायदा उद्योग धंदे चालऊन?
हे सर्व मुद्दे फक्त उमेदवाराचे राजकारण नाही, तर त्याचे चारित्र्य, निष्ठा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकीही स्पष्ट करतात. मतदारांनी फक्त घोषणांवर व मतांसाठी फेकलेल्या पैस्यावर न थांबता उमेदवाराचा जाहीरनामा मागावा, त्यातील प्रत्येक मुद्दा तपासावा आणि त्याच्या वास्तवतेचा शोध घ्यावा.
विकासाच्या नावाखाली केवळ आश्वासन नको, कृती हवी!
आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांत रस्त्यांची, वाडीत जाणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा, गटार व्यवस्थेचा अभाव, मोबाईल नेटवर्कची समस्या, आरोग्य सुविधांचा अभाव ही वास्तवता आहे. विमानतळ (सुरू) आहे पण सिंधुदूर्ग मुंबई सेवा बंद झाली ती अजून खासदार, आमदार, मंत्री यांना सूरू करणे श्यक्यच झाले नाही. पर्यटन वाढेल... थोड्या प्रमाणात वाढलंही पण ते सुद्धा हंगामी कायम स्वरूपी कधी वाढणार?उद्योग येतील? कधी आणि कोणते? रोजगाराची संधी आणू? अशी आश्वासने वर्षानुवर्षे दिली जात आहेत, पण प्रत्यक्षात कृती दिसत नाही.
म्हणूनच या निवडणुकीत मतदारांनी भावनांवर नाही, तर कामगिरीवर मतदान करावे. गाव, तालुका आणि जिल्हा यांच्या प्रगतीसाठी जबाबदार नेतृत्व निवडणे हेच खरे लोकशाहीचे सामर्थ्य आहे.
आणि हा "अच्छे दिन आयेंगे" याची व्याख्या मात्र प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला विचारायला विसरू नका😀
थोडक्यात:-
मतदारांनी पक्ष, नातेसंबंध किंवा प्रसिद्धीपेक्षा उमेदवाराच्या कार्यावर आणि प्रामाणिकतेवर मतदानाचा निर्णय घ्यावा. जागरूक मतदारच खऱ्या अर्थाने लोकशाहीला बळकटी देतो.
“विचारपूर्वक मतदान – हाच लोकशाहीचा खरा उत्सव.”
सजग मतदारच सजग लोकशाही निर्माण करू शकतो! 🗳️
✍️ सचिन सामंत
Comments
Post a Comment